विसात नव्वद शोधू नको
नोव्हेंबर 8, 2020माझाच देव महान
जानेवारी 17, 2021अनादी अनंत लढा
युगानुयुगं चाललेल्या ह्या लढ्याला सणासुदीच्या दिवसांत विशेषतः दिवाळीमध्ये एखाद्या महायुद्धाचं रूप प्राप्त होतं. समोर चिवडा शेवेचं अकरा अक्षौहिणी सैन्य उभं ठाकलेलं असतं ज्याचं नेतृत्व लाडू, चकली, करंजी, अनरसा अशा आपल्या प्रियजनांच्या हाती असतं. मनातील श्रीहरी आपल्याला ‘युद्ध्य च’ करण्यास प्रवृत्त करत असतो, आणि आपण मात्र गाण्डीवाचा त्याग करून हतवीर्य होऊन त्या शत्रूला शरण जातो …ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/NnkekN9OgGo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
विजय दिसेना दृष्टीक्षेपात
हार मानणे डसे मनात
द्विधा चित्त पडते पेचात
कसा सुटावा तिढा
अनादी अनंत लढा ॥ १ ॥
जराशी जरी नजर हटे
दुर्घटना तत्क्षणी घटे
निग्रहाची सीमाही पटे
कशी टळावी पिडा
अनादी अनंत लढा ॥ २ ॥
घास गोड लागत नाही
भूक मात्र लागत राही
मनी चिंता पोखरू पाही
पापाचा जणू घडा
अनादी अनंत लढा ॥ ३ ॥
तुडवून झाल्या किती वाटा
उसंत नाही श्रमी आता
सलत राहिला तरी काटा
किती मोठा आकडा
अनादी अनंत लढा ॥ ४ ॥
‘दीक्षित’ झालो समरसूनी
‘दिवे करां’नी उजळवूनी
तम न जाई काही करुनी
जाई निश्चयी तडा
अनादी अनंत लढा ॥ ५ ॥
असे पाहतो किती असती
शत्रूस जे पुरुनी उरती
लढ्यात ह्या विजयी होती
शिकविल कोण धडा
अनादी अनंत लढा ॥ ६ ॥
अंतरी माझ्या एक वसे
सडपातळ ती व्यक्ती असे
शोध तिचा मज लावी पिसे
लावू कसा मी छडा
अनादी अनंत लढा ॥ ७ ॥
पराभवाने येई रडू
गोडही मुखात होई कडू
नव्या दमाने उद्या लढू
पण माझा निधडा
अनादी अनंत लढा ॥ ८ ॥
शंका मनास कधी छळते
लढूनी काय मजला मिळते
आरशात पाहून कळते
शिकतो ऐसा धडा
अनादी अनंत लढा ॥ ९ ॥
लोकांचे ऐके नेहमी
बाकी माझ्यात नाही कमी
लठ्ठ राहीन असाच मी
हसा कुणी का रडा
अनादी अनंत लढा ॥ १० ॥