मार्च 26, 2023

मोकळा वेळ

उतारावरून वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणे माणसं बेबंद आयुष्यं जगत होती. मध्येच महामारीचा धोंडा पडला आणि पाणी काही काळाकरता शांत झालं. काही काळाने विज्ञानाच्या मदतीने हा धोंडा दूर झाला आणि मोकळा वेळ म्हणजे काय हे भान आलेली माणसं पुन्हा एकदा बेभानपणे धावू लागली. हाती असलेला वेळ अमर्याद असल्याप्रमाणे ..

तुम्हाला हल्ली मोकळा वेळ मिळतो का?

अंहं … रात्री झोपण्यापूर्वी मोजून मापून फोन आणि टीवी बघायला मिळणारा नव्हे
शनिवार रविवारी घरच्या कामाकरता मिळणारा नव्हे
वर्षातून एकदा सुट्टी घेऊन
पहाटे पाच वाजता उठायला लावणाऱ्या कण्डक्टेड टूर्समध्ये मिळणारा … तोही नव्हे

मोकळा म्हणजे खरोखर मोकळा
लहानपणी मुंग्यांची रांग बघण्याकरता मिळायचा … तसा
शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टीत
वाळत घातलेल्या पापडांची राखण करताना मिळायचा … तसा
कॉलेजच्या दिवसांत स्टेशनवरून घरी रमत गमत पायी येताना मिळायचा … तसा

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/x6GTEyX2AxI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 13, 2023

प्राक्तन

प्राक्तन, नियती, नशीब, भाग्य, दैव, ललाटीचा लेख, विधिलिखित, भोग... भविष्यात काय वाढून ठेवलंय ह्याकरता आपण किती शब्दांचा वापर करतो. उद्याची तजवीज करण्याची दुर्दम्य इच्छा आपल्या मनात असते आणि तसे आपण सरळ रेषेत वागत असतो. मात्र उद्या येणाऱ्या एखाद्या अनपेक्षित वळणाकरता आपल्याला कधीच तजवीज करता येत नाही.

गरुडराज नभी विहरत होते बोल मधुर ते पडले कानी
पोपट पृथ्वीवरती होता मधुर जयाची होती वाणी
गुणी अशा पोपटास भेटून गरुडराजही झाले अंकित
गरुड शुकाची मैत्री पाहून तिन्ही लोक ते होती अचंबित
काहीच नव्हते समान तरीही एकमेकांस स्वभाव गमले
प्राक्तनात जे लिहिले आहे बदलण्यास ते कुणास जमले ॥

माझी ‘प्राक्तन’ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/okTJP32oNBo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा

प्रेमोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! प्रेमात पडल्यावर माणसाचं विशेषतः पुरुषाचं माकड होतं ह्यात काही वाद नाही. प्रेमात पडलेला राजा असो वा रंक, बलदंड असो वा पेदरट, कॉलेजकुमार असो वा ऑफिसमधला बॉस.. क्यायच्या क्याय वाटणं आणि क्यायच्या क्याय वागणं साहजिक असतं. आणि मग ते तसं वाटणं आणि तसं वागणं बोलण्यात दिसून येणं हे ओघानेच आलं..

एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥

एक दिवस करायचाय गं नक्की तुला फोन
विचाराने कावरे बावरे डोळे माझे दोन
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
आवाज तुझा ऐकल्याशिवाय करमत नाही आता ॥

माझी ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/7bKCy8pf_Ek ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 18, 2022

… अडलं नाही बुवा

नास्तिक व्यक्ती बोलताना फार जपून बोलते. कधी आणि कशामुळे कुणाच्या भावना दुखावतील ह्याचा काही भरवसा नसतो. शिवाय देव मानणाऱ्या व्यक्तीचा दुसरा कुठला देव मानणाऱ्यांपेक्षा देव न मानणाऱ्या व्यक्तीवर जास्त राग असतो. पण मग नास्तिक व्यक्तींना स्वतःच्या काही भावना नसतात का? एखाद्या नास्तिक व्यक्तीने आपल्या भावना व्यक्त करायचं ठरवलं तर त्या कश्या असतील?

आयुष्यात विलक्षण काही घडलं नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥

देवभक्ती म्हणतात असते संस्कारांची ठेव
पण चागलं वागा कळण्यासाठी हवा कशाला देव
वडिलधाऱ्यांचं ऐकून कुणी बिघडलं नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/1UwkJpBoYGE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 25, 2022

छेड

आज आंतरराष्ट्रीय स्त्रियांवरील अत्याचार विरोधी दिवस आहे. स्त्रीच्या नकारातच होकार दडलेला असतो वगैरे भंपक कल्पनांना पुरुषप्रधान समाज नेहमीच खतपाणी घालत आला आहे. स्त्रियांची छेड काढणं ह्यात स्त्रियांनाही आनंद मिळतो असले पुरुषांनी करून घेतलेले गोड गैरसमज किती अवाजवी आहेत हे जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळेल ..

समजून चुकली तीही बहुधा
	बोले माझी नजर
टाळू लागली मला आणि
	सावरू लागली पदर ॥

झाला असता स्पर्श माझा
	चुकार तो सवंग
सावरून बसली ती आपलं
	चोरून घेतलं अंग ॥

ठाऊक होता खेळ मला
	जाणार नव्हतो हार
आयुष्यातील माझ्या नव्हती
	पहिली ही शिकार ॥

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/4FLpIxG9bac ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 23, 2022

देव

हल्लीच्या तापलेल्या (किंवा तापवलेल्या) राजकीय वातावरणात देवाला बरे दिवस आले आहेत. तसा सर्वसामान्य माणसाचा देवावर विश्वास असतोच. संकटसमयी बहुतेकांना देवाचाच आधार वाटतो. मात्र देव म्हणजे नक्की काय ह्याचं उत्तर प्रत्येक व्यक्ती खचितच वेगळं देईल.

लहान मूल गर्दीमध्ये
     वाट चुकलं होतं
अनोळखी चेहरे पाहून
     पार बुजलं होतं

गळ्यात आयकार्ड गेली एका
     इसमाची नजर
चिमुकला हात धरून
     गाठून दिलं घर

छोटुल्याला बघुन आई रडली धाय धाय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥

लोकलमधून लटकत होतो
     बॅगेकडे लक्ष
खांबामुळे होणार होता
     माझा कपाळमोक्ष

माझ्या दिशेने गर्दीमधून
     हात आले चार
एवढ्या गर्दीत आत घेतलं
     जसा चमत्कार

खरं तर आत जागा नव्हती ठेवायलाही पाय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/NJU_PDnFHcE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 8, 2022

पुरुषप्रश्न

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! महिलांचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत हे एकदा पुरुषांनी मान्य केलं की उरतात ते पुरुषांचे प्रश्न. पण मग आजच्या महिलादिनी हे प्रश्न उपस्थित करण्याचं काय औचित्य आहे? औचित्य आहे. कारण आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाबद्दल कधी ऐकिवात आलेलं नाही.

तुम्हीच सांगा आम्ही पुरूषांनी वागावं तरी कसं
कसंही वागलं तरी शेवटी आमचंच होतं हसं ॥

बायकोचं ऐकावं तर आर्इ म्हणते गेलास तू माझ्यापासून लांब
आईचं ऐकावं तर बायको म्हणते तू तर अगदीच भोळा सांब
तुम्हीच सांगा आम्ही पुरूषांनी वागावं तरी कसं
दोघींना आवडेल असं वाक्य तरी सुचवा एक छानसं ॥

माझी ‘पुरुषप्रश्न’ ही कविता यूट्यूबवर ह्या https://youtu.be/qpK1i8iHqoo ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 14, 2022

प्रेमात पडल्यावर काय होतं

आज पाश्चात्य देशांत प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. तसं बघायला गेलं तर प्रेमाच्या उत्सवाला दिवस कशाला हवा? माणूस कधीही, कुठेही आणि कोणाच्याही प्रेमात ‘पडू’ शकतो. प्रेमात पडलेल्या माणसांची काही विशिष्ट लक्षणं असतात. पण इतरांमध्ये ही लक्षणं शोधण्यापूर्वी एकदा विचार करा. कदाचित इतरांना तुमच्यात ही लक्षणं दिसत नसतील ना?

प्रेमात पडल्यावर काय होतं ?
प्रेमात पडल्यावर माणसाचं होतं गाढव
कधी केस तर कधी दाढी वाढव
समजतच नाही मित्र काय बोलतायत ते
आणि समजलं तर सुरू होतं त्याचं अकांडतांडव ॥

प्रेमात पडल्यावर काय होतं ?
प्रेमात पडल्यावर माणूस होतो आंधळा
फडतुस चित्रपटांना रडतो काढून गळा
भिंतीकडे पाहात गाऊ लागतो गाणी
माझ्या पिरतीचं पाणी आणि तुझा ज्वानीचा मळा ॥

माझी ‘प्रेमात पडल्यावर काय होतं’ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Tkph0SenzzY ह्या ठिकाणी ऐकता येईल. 
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं

निवडणुका जवळ आल्या की समाजातील धृवीकरण वाढू लागतं. इतकं की समाजातील निरनिराळे घटक महामानवांनाही आपसात वाटून घेतात. मग आपल्या महामानवाचं उदात्तीकरण आणि समोरच्या महामानवाचं चारित्र्यहनन ह्याकरता शब्दांचे खेळ सुरु होतात. ते इतक्या टोकाला जातात की काही दिवसांनी ते शब्द उच्चारणाऱ्यांचा त्यावर ठाम विश्वास बसतो आणि समाजातील हे विष वाढतच जातं .. 

हाताला बोचलं की चिडून प्रत्येकाला वाटे
किती क्लेशदायक आहेत हे गुलाबपुष्पाचे काटे
आपण रंगसुवासाचं अद्भूत मिश्रण पाहावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥

आई वडिलांचं वागणं कधी मनाला पटत नाही
त्याचं बोलणं कधी मनाला रूचत नाही
आपण त्यांचं आपल्यावर असलेलं निर्व्याज प्रेम आठवावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥

माझी ‘चागलं तेवढं घ्यावं’ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/dkSkCB_p5Jg ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 3, 2022

विद्ध

सीताहरणाकरता स्वतःला जबाबदार ठरवून पश्चात्तापाच्या आगीत होरपळणाऱ्या लक्ष्मणाने प्रभू श्रीरामांकडे दयेची याचना केली. सीतेच्या विरहामुळे व्याकूळ झालेल्या श्रीरामांना लक्ष्मणाची त्यांच्याप्रती समर्पण भावना पुन्हा एकदा जाणवली. मात्र त्याहीपुढे जाऊन त्या हळव्या क्षणी इतके दिवस स्वतःचं दुःख बाजूला सारून लक्ष्मणाने दाखवलेली निष्ठा त्यांना समजून आली ..

चंदनापरी शीतल मनही दग्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥

भार्येचा विरह आज सहन मला होईना
वनवासी निजदिनी तू तेच दुःख सोसले
आत्ममग्न विस्मरलो दुःख तुझे नाही ना
जाणवता व्यथा तुझी मन हे ओशाळले

ऐकुनी ते वचन मनी सुरु युद्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥

माझी ‘विद्ध’ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/LduVdOTIlxI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..

तुमच्याही बाबतीत असं होत असेल ना? म्हणजे बघा सकाळी गजर वाजतो. आपण म्हणतो थोडं आणखीन झोपतो आणि मग जेव्हा जाग येते तेव्हा एकदम अर्धा तास उलटून गेलेला असतो. किंवा एखादा आवडलेला पदार्थ भूक नसतानाही आपण थोडा आणखीन खातो आणि मग पोट बिघडतं. हे ‘थोडं आणखीन’ त्या काडीचं नाव आहे ज्यामुळे म्हणीतल्या उंटाची शेवटी पाठ मोडून जाते ..

आल्याचा मंद सुगंध
सुंदर दिसत होता रंग
म्हटलं थोडं आणखीन दुध घालू या
... आणि चहा दुधाळ झाला ॥

मैत्रीचं नातं असं घट्ट
संकटातही उभा राहायचा दत्त
म्हटलं थोडा आणखीन वाद घालू या
... आणि मित्र रुसून गेला ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/b1XLQIPp1-M ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 1, 2021

देव बसला वर ..

देवाने माणसाला स्वसंरक्षणाकरता अणकुचीदार दात, धारदार नखं, तीक्ष्ण नजर, पळण्याचा वेग, उडण्याची क्षमता, विषारी दंश, केसाळ त्वचा ह्यापैकी काहीही दिलं नाही. दिली ती फक्त विकसित होत जाणारी बुद्धी आणि मग देव म्हणाला, जा माझ्या प्रिय बालका, जा आणि पृथ्वीवर राज्य कर. मात्र गेल्या काही सहस्रकांमध्ये माणसाने पृथ्वीवर जो हैदोस घातला आहे, त्यामुळे बहुधा देवही हताश झाला असेल ..

देव बसला वर आम्ही खाली जमिनीठायी
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥

गरीब राहतो गरीब कारण पैसा ओढतो पैसा
अफरातफर गुन्हे करा नाहीतर तसेच बैसा
भाकर-तुकडा मिळत नसेल तर भोजन करा शाही
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVGQeuSvdwU ह्या ठिकाणी ऐकता येईल.