ऑक्टोबर 3, 2014

जाणार नाहीस ना

हल्ली internet आणि mobileवर दहापैकी नऊ विनोद हे बायको ह्या व्यक्तीबद्दल असतात. पिकतं तिथे विकत नाही हेच खरं कारण ज्यावेळी पुरुषावर कौटुंबिक, सामाजिक किंवा आर्थिक संकट येतं तेव्हा collegeमधल्या मैत्रिणी किंवा सिनेमातल्या नायिका नाहीत तर हीच अर्धांगिनी पुरुषाच्या मागे ठामपणे उभी राहते. अशा वेळी धास्तावलेला पुरुष एकच प्रश्न विचारत राहतो . . . तू मला सोडून तर 'जाणार नाहीस ना?'

निकड भासते पदोपदी मज
     नसते जेव्हा सानिध्य
मला उगाच स्वावलंबी
     करून जाणार नाहीस ना

ह्या हृदयाच्या गाभाऱ्यातील
     सुगंध आहे तुझ्यामुळे
धुराप्रमाणे उदबत्तीच्या
     विरून जाणार नाहीस ना

वळण आलं वाटेमध्ये
     सरळ जाणार नाहीस ना
तेव्हा माझा हात सोडून
     दूर जाणार नाहीस ना
जानेवारी 20, 2012

शेवटची भेट

मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या प्रेमात पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात "मी तुझ्याकडे 'तशा' नजरेने कधी पाहिलंच नाही" ह्या विधानाची जबरदस्त धास्ती असते. आणि मग एकदा का हे विधान ऐकावं लागलं तर ती मैत्री तरी अबाधित राहू शकते का?

...
नकार दिलास तू आणि आपल्यातला मोकळेपणा संपला
जोर लावून उघडला की जसा दुभंगून जातो शिंपला
भेटी संपल्या आपल्या काही कारणच नव्हतं मिळत
आणि खरं सांगू? कारण मिळालं तरी भेटायचं मीच होतो टाळत
...
जून 17, 2011

तिची आणि माझी भेट

काही दिवसांपूर्वी मला लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी सोहोळ्याला उपस्थित राहण्याची एकदा नाही तर दोनदा संधी मिळाली. लग्नाला पन्नास वर्षं होणं म्हणजे समजुतदारपणा आणि आरोग्य ह्यांचा दुर्मिळ संगम. पन्नास वर्षांपूर्वी जग कसं होतं ह्याचा विचार केला तर पन्नास वर्षं म्हणजे केवढा मोठा कालखंड आहे ते लक्षात येईल. सादर आहे ह्याच विचारांवर बनलेली एक कविता 'तिची आणि माझी भेट'.

नरी कॉन्ट्रॅक्टर होता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार
पुलंची अपूर्वाई आणि गणगोत ही पुस्तकं लोकप्रिय झाली होती फार
मुघल-ए-आझमच्या भव्यतेने लोक वेडे झाले होते पार
लताचं अल्ला तेरो नाम रेडिओवर वाजत आणि गाजत होतं सातही वार
जेव्हा दिलीप वेंगसरकरचं वय होतं फक्त चार
तेव्हा तिची आणि माझी भेट झाली
     पन्नास वर्षांपूर्वी
फेब्रुवारी 4, 2011

बदलू नकोस

लग्नाआधी एकमेकांना भेटायला जाताना प्रियकर आणि प्रेयसी सिंड्रेला बनून जातात. आणि मग लग्नाचे बारा वाजले की बग्गीचा भोपळा आणि घोड्यांचे उंदीर होतील की काय अशी सतत भीती वाटत राहते. म्हणूनच ह्या प्रियकराचं आपल्या प्रेयसीकडे एकच मागणं आहे ...

भेटतो जेव्हा तुला माझं प्रसन्न होतं मन
     असणं तुझं सुवास आणि हसणं सूर्यकिरण
जग वाटतं निर्मळ आणि जगणं वाटतं सोपं
     अशक्य गोष्टींवरचं तुटतं अशक्यतेचं बंधन

आयुष्य माझं उजळवणं हे थांबवू नकोस तू
     एकच मागणं आहे पुढे बदलू नकोस तू
फेब्रुवारी 4, 2011

एकच मजला सांग …

स्त्रियांचा नटण्याचा आणि पुरुषांचा त्यांचं नटणं पाहण्याचा हे दोन्ही छंद पूर्वापार चालत आलेले आहेत. आणि पुरुषांनी तसं पाहणं आणि स्त्रियांनी लटक्या रागाने नाकं मुरडणं हा खेळही प्राचीन काळापासून सुरु आहे. अशा वेळी पुरुषांना म्हणावसं वाटतं ...

निसर्गनिर्मित घटना आहे छंद तुला नटण्याचा
     निसर्गनिर्मित घटना आहे छंद मला बघण्याचा
मीच एकटा बघत नाही गं तुझ्या रूपाची किमया
     तूच एकटी दिसत नाही गं ह्मा नयनांच्या द्वया

मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
     नरनारीतील आकर्षण ते कळला कोणा थांग