मे 23, 2022

देव

हल्लीच्या तापलेल्या (किंवा तापवलेल्या) राजकीय वातावरणात देवाला बरे दिवस आले आहेत. तसा सर्वसामान्य माणसाचा देवावर विश्वास असतोच. संकटसमयी बहुतेकांना देवाचाच आधार वाटतो. मात्र देव म्हणजे नक्की काय ह्याचं उत्तर प्रत्येक व्यक्ती खचितच वेगळं देईल.

लहान मूल गर्दीमध्ये
     वाट चुकलं होतं
अनोळखी चेहरे पाहून
     पार बुजलं होतं

गळ्यात आयकार्ड गेली एका
     इसमाची नजर
चिमुकला हात धरून
     गाठून दिलं घर

छोटुल्याला बघुन आई रडली धाय धाय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥

लोकलमधून लटकत होतो
     बॅगेकडे लक्ष
खांबामुळे होणार होता
     माझा कपाळमोक्ष

माझ्या दिशेने गर्दीमधून
     हात आले चार
एवढ्या गर्दीत आत घेतलं
     जसा चमत्कार

खरं तर आत जागा नव्हती ठेवायलाही पाय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/NJU_PDnFHcE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 8, 2022

पुरुषप्रश्न

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! महिलांचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत हे एकदा पुरुषांनी मान्य केलं की उरतात ते पुरुषांचे प्रश्न. पण मग आजच्या महिलादिनी हे प्रश्न उपस्थित करण्याचं काय औचित्य आहे? औचित्य आहे. कारण आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाबद्दल कधी ऐकिवात आलेलं नाही.

तुम्हीच सांगा आम्ही पुरूषांनी वागावं तरी कसं
कसंही वागलं तरी शेवटी आमचंच होतं हसं ॥

बायकोचं ऐकावं तर आर्इ म्हणते गेलास तू माझ्यापासून लांब
आईचं ऐकावं तर बायको म्हणते तू तर अगदीच भोळा सांब
तुम्हीच सांगा आम्ही पुरूषांनी वागावं तरी कसं
दोघींना आवडेल असं वाक्य तरी सुचवा एक छानसं ॥

माझी ‘पुरुषप्रश्न’ ही कविता यूट्यूबवर ह्या https://youtu.be/qpK1i8iHqoo ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 14, 2022

प्रेमात पडल्यावर काय होतं

आज पाश्चात्य देशांत प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. तसं बघायला गेलं तर प्रेमाच्या उत्सवाला दिवस कशाला हवा? माणूस कधीही, कुठेही आणि कोणाच्याही प्रेमात ‘पडू’ शकतो. प्रेमात पडलेल्या माणसांची काही विशिष्ट लक्षणं असतात. पण इतरांमध्ये ही लक्षणं शोधण्यापूर्वी एकदा विचार करा. कदाचित इतरांना तुमच्यात ही लक्षणं दिसत नसतील ना?

प्रेमात पडल्यावर काय होतं ?
प्रेमात पडल्यावर माणसाचं होतं गाढव
कधी केस तर कधी दाढी वाढव
समजतच नाही मित्र काय बोलतायत ते
आणि समजलं तर सुरू होतं त्याचं अकांडतांडव ॥

प्रेमात पडल्यावर काय होतं ?
प्रेमात पडल्यावर माणूस होतो आंधळा
फडतुस चित्रपटांना रडतो काढून गळा
भिंतीकडे पाहात गाऊ लागतो गाणी
माझ्या पिरतीचं पाणी आणि तुझा ज्वानीचा मळा ॥

माझी ‘प्रेमात पडल्यावर काय होतं’ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Tkph0SenzzY ह्या ठिकाणी ऐकता येईल. 
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं

निवडणुका जवळ आल्या की समाजातील धृवीकरण वाढू लागतं. इतकं की समाजातील निरनिराळे घटक महामानवांनाही आपसात वाटून घेतात. मग आपल्या महामानवाचं उदात्तीकरण आणि समोरच्या महामानवाचं चारित्र्यहनन ह्याकरता शब्दांचे खेळ सुरु होतात. ते इतक्या टोकाला जातात की काही दिवसांनी ते शब्द उच्चारणाऱ्यांचा त्यावर ठाम विश्वास बसतो आणि समाजातील हे विष वाढतच जातं .. 

हाताला बोचलं की चिडून प्रत्येकाला वाटे
किती क्लेशदायक आहेत हे गुलाबपुष्पाचे काटे
आपण रंगसुवासाचं अद्भूत मिश्रण पाहावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥

आई वडिलांचं वागणं कधी मनाला पटत नाही
त्याचं बोलणं कधी मनाला रूचत नाही
आपण त्यांचं आपल्यावर असलेलं निर्व्याज प्रेम आठवावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥

माझी ‘चागलं तेवढं घ्यावं’ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/dkSkCB_p5Jg ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 18, 2022

भारत रत्न खान अब्दुल गफार खान

फेब्रुवारी ६, २०२२

आज भारत रत्न खान अब्दुल गफार खान ह्यांचा जन्मदिवस आहे.

‘भारत रत्न मालिका’ यूट्यूबवर https://youtu.be/cFpErzIEiOY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 18, 2022

भारत रत्न भीमसेन जोशी

फेब्रुवारी ४, २०२२

आज भारत रत्न पंडित भीमसेन जोशी ह्यांचा जन्मदिवस आहे.

‘भारत रत्न मालिका’ यूट्यूबवर https://youtu.be/mwQP7LPjOVo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 18, 2022

भारत रत्न सी सुब्रमण्यम

जानेवारी ३०, २०२२

आज भारत रत्न सी सुब्रमण्यम ह्यांचा जन्मदिवस आहे.

‘भारत रत्न मालिका’ यूट्यूबवर https://youtu.be/24GTD9Ch8ew ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 18, 2022

भारत रत्न मालिका

कोणत्याही देशाची ओळख त्या देशातील माणसांमुळे होते. मात्र त्या माणसांपैकी काही नररत्नं त्या देशाला महान बनवतात. आधुनिक भारताच्या सामाजिक आणि वैचारिक जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या अशाच काही कर्तृत्ववान व्यक्तींची पारख करून त्यांना स्वतंत्र भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारत रत्न’ देऊन सन्मानित केलं जातं. आपल्याला अभिमान वाटावा अशा ह्या भारतरत्नांची थोडक्यात ओळख करून देणारी ही भारत रत्न मालिका ...

‘भारत रत्न मालिका’ यूट्यूबवर https://youtu.be/0lp1uH29VCA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 3, 2022

विद्ध

सीताहरणाकरता स्वतःला जबाबदार ठरवून पश्चात्तापाच्या आगीत होरपळणाऱ्या लक्ष्मणाने प्रभू श्रीरामांकडे दयेची याचना केली. सीतेच्या विरहामुळे व्याकूळ झालेल्या श्रीरामांना लक्ष्मणाची त्यांच्याप्रती समर्पण भावना पुन्हा एकदा जाणवली. मात्र त्याहीपुढे जाऊन त्या हळव्या क्षणी इतके दिवस स्वतःचं दुःख बाजूला सारून लक्ष्मणाने दाखवलेली निष्ठा त्यांना समजून आली ..

चंदनापरी शीतल मनही दग्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥

भार्येचा विरह आज सहन मला होईना
वनवासी निजदिनी तू तेच दुःख सोसले
आत्ममग्न विस्मरलो दुःख तुझे नाही ना
जाणवता व्यथा तुझी मन हे ओशाळले

ऐकुनी ते वचन मनी सुरु युद्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥

माझी ‘विद्ध’ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/LduVdOTIlxI ह्या ठिकाणी ऐकता येईल.