डिसेंबर 18, 2015

माकड आणि माणूस

माकड आणि माणसाचा पूर्वज एकच होता असं विज्ञान सांगतं. ह्याबाबतीत विज्ञानाची प्रमेयं आणि सिद्धांत काही असोत, पण बरेचदा माणूस आपल्या वागण्याने ह्या विधानाची सत्यता सिद्ध करताना दिसतो. माणसांवर उपचार करण्यापूर्वी बऱ्याच वैद्यकीय चाचण्या माकडांवर केल्या जातात. ह्यात वैद्यकीय मानसोपचाराचाही समावेश होतो. अशाच एका चाचणीचे निष्कर्ष काय आले ते पाहा...

पाहण्याकरता एकदा माणसं कशी वागतात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात

खोलीमध्ये शिडी एक
    उभी होती केली
हुशार एका माकडाची
    नजर त्यावर गेली
शिडीवरती टांगला होता
    केळ्यांचा एक घड
खुणवत होता खायला मला
    शिडीवर तू चढ

माकडाला त्या झालं कधी लावीन त्याला दात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात
डिसेंबर 4, 2015

पोटचा गोळा

"परत मुलगीच झाली . . . अरेरे!" हे विधान आजही काही तथाकथित सुसंपन्न, सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबांमध्ये ऐकू येत असेल तर मग समाजातील इतर घटकांबद्दल काय बोलावं! स्त्रीभ्रूण हत्येपासून सुरु होणारे स्त्रियांवरील अत्याचारांचे हे कलंक आपल्या समाजातून कधीतरी कायमचे पुसले जातील का?

होती चौथी वेळ तरीही धास्तावलेली होती
कारण प्रत्येक वेळी पूर्वी मुलगी झाली होती

पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणून कौतुक
दुसऱ्या वेळी मुलगी पाहून सासर झालं मूक

तिसऱ्या वेळी तर सासूच्या शब्द आले ओठी
आमच्या नशिबी का गं आलीस तू तर कपाळकरंटी

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/KUexfT78vsk ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 20, 2015

आठवणी

भाषा ही शेवटी भावना व्यक्त करण्याचं केवळ एक साधन आहे. आपण बोललेल्या, ऐकलेल्या शब्दांतून मनाला जो संदेश मिळतो तो शब्दांपलीकडला असतो. कालांतराने शब्द विसरले जातात पण त्या संदेशाचा ठसा आठवणीच्या रूपाने मनावर कायम उमटलेला राहतो. शब्दांवर शब्दांचा उतारा असू शकतो पण ह्या आठवणींवर उतारा नसतो ...

मोठा झालो कमवू लागलो
रंगलो माझ्या रंगी
वाटू लागले सर्व जगाची
बुद्धी माझ्या अंगी
विचार करण्या फुरसत नव्हती
असा जीवनी वेग
शब्दांचे पण तीर लागले
दगडावर जणू रेघ

उशिरा कळले समय प्रवाही शब्द वाहून जातात
     आठवणी राहून जातात
नोव्हेंबर 6, 2015

राग

आपल्या आयुष्यात आपला एखादा मित्र, मैत्रीण किंवा आप्त आपल्यावर रागावतो, रुसतो. अनेकदा ही गोष्ट आपल्या बरीच उशिरा लक्षात येते. आपण समजूत काढण्याचा, मन वळवण्याचा प्रयत्न करतो पण ती व्यक्ती बधत नाही. त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे हा विचार एकतर्फी तर नाही ना अशी शंका आपल्या मनात येऊ लागते. मन उदास होऊ लागतं ...
 
तुलाही असंच वाटतंय, की हे आहेत माझ्याच मनाचे खेळ?
तुझ्याकडे कदाचित माझा विचार करायलाही नसेल वेळ

माझी काही चूक असेल तर ती सुधारायची संधी तरी होती का?
इतकी कशी रागावलीस
     आपल्यात इतकी मैत्री तरी होती का?

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ZEpH1FsUp0o ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑक्टोबर 16, 2015

घर

काही लोकांच्या घरची टापटीप बघितली की मला कमीपणा वाटत असे. सगळं कसं आखीव रेखीव . . . प्रत्येक वस्तू जागच्या जागी . . . स्वच्छता तर इतकी की जमीन पाहून भांग पाडावा . . .  पण अशा घरांमध्ये मला अवघडून गेल्यासारखं का वाटतं? आपल्या हातून कोचावर चहा सांडेल, काचेची फुलदाणी फुटेल, चमचा हातातून पडेल अशी भीती सारखी का वाटत राहते? मग मी माझं घर नीट निरखून पाहिलं . . . आणि हळूहळू मला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागली... 

कोपऱ्यात एक जळमट
खुर्चीवर डाग कळकट
भिंत थोडीशी तेलकट
पण इथल्या प्रत्येक वस्तूवर मायेचा थर आहे
     ही शोरूम नाही घर आहे

थोडे कपडे अस्ताव्यस्त
पलंगावर चादरी स्वस्त
पुस्तकं इतस्ततः मस्त
पण इथे हवी ती वस्तू हव्या त्या जागेवर आहे
     हे हॉटेल नाही घर आहे
ऑक्टोबर 2, 2015

चांगलं तेवढं घ्यावं

थोर व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करण्यात काही वावगं नाही. मात्र ते करताना त्यांच्या केवळ त्रुटी दाखवून देऊन आपलं पुरोगामित्व सिद्ध करणं ह्यात काही अर्थ नाही. थोर व्यक्तींना थोरपण ज्या गुणांमुळे लाभतं तेवढे गुण घावेत, त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि बाकी सारं सोडून द्यावं...

हाताला बोचले की चिडून प्रत्येकाला वाटे
किती क्लेशदायक आहेत हे गुलाबपुष्पाचे काटे
आपण रंगसुवासाचं अद्भुत मिश्रण पाहावं
     प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं

दुर्गुणांचा विचार करणं सोडावं
     प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं
सप्टेंबर 18, 2015

आठव

'अतिपरिचयात अवज्ञा . . .' असं म्हटलं जातं पण ते प्रत्येक बाबतीत खरं असेलच असं नाही. आपल्याला अतिशय निकट असलेल्या व्यक्तीचा सहवास आपल्या अंगवळणी पडू लागतो. आणि मग त्या व्यक्तीपासून दूर गेलं की लहान सहान गोष्टींमधून त्या व्यक्तीचा विरह जाणवू लागतो. आपण 'आपलं माणूस' म्हणू शकतो अशा व्यक्तीची खरी ओळख हीच असावी...

कधी कानावर ये तान
     विसरून ऐकतो भान
स्मरणातील सुंदर गान
     मज येई तुझा आठव

कुणी सारी केस बोटाने
     अन् ओठ दाबी दाताने
हनुवटी धरी हाताने
     मज येई तुझा आठव
ऑगस्ट 21, 2015

बायकोचा मित्र

'घर की मुर्गी दाल बराबर' ही उक्ती लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाला लागू पडत असावी असा समज WhatsAppवर येणाऱ्या 'बायको' ह्या विषयावरील संदेशांच्या वर्दळीमुळे होणं साहजिक आहे. त्यामुळे 'बाहर की दाल मुर्गी बराबर' वाटणंही ओघानेच आलं. मात्र मध्यमवयीन पुरुषांच्या आयुष्यात येणारी बाहरवाली कुणाचीतरी बायको असते हे सोयीस्कररीत्या विसरलं जातं.

दुपारनंतर कुणास ठाऊक किती झाले चहा
आणि कूर्मगतीने वेळ सरकत वाजले एकदाचे सहा

थोडा वेळ चोळले कपाळावरचे आणि मानेचे स्नायू
मग हळूच लिहिलं लॅपटॉपवरील चॅटवर 'हॅलो, हाऊ आर यू'

'गिव मी टू मिनिट्स' असा मेसेज माझ्या स्क्रीनवर चढला
वाट पाहणारा माझा जीव भांड्यात पडला

रोज संध्याकाळचा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा
आता रंगतील चांगल्या तास दीड तास गप्पा
ऑगस्ट 7, 2015

युधिष्ठीर आणि दुर्योधन

'सर्वसाधारण नागरिक भ्रष्टाचारामुळे भरडला जात आहे' ह्याबाबत सर्वांचं एकमत आहे. पण अनेकदा सर्वसाधारण नागरिकाला भरडणाराही एक सर्वसाधारण नागरिकच असतो असा अनुभव येतो. भ्रष्टाचार म्हटलं की आपण लगेच राजकारण्यांच्या नावाने बोटं मोडतो पण नीट डोळे उघडून पाहिलं तर आजूबाजूला प्रत्येक पातळीवर भ्रष्टाचार सुरु असल्याचं जाणवतं. मग भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन व्हावं असं नक्की कोणाला वाटतंय? . . .

रिक्षाचालक दुर्योधनाने मीटरमध्ये केला होता फेरफार
युधिष्ठीर कारकून जेव्हा रिक्षाने स्टेशनवरून घरी गेला

कारकून दुर्योधनाने कार्ड देण्यापूर्वी चहापाण्याकरता पैसे मागितले
युधिष्ठीर पोलीस जेव्हा रेशन कार्ड बनवायला गेला

पोलीस दुर्योधनाने गाडी अडवून लाच मागितली
युधिष्ठीर डॉक्टरची गाडी जेव्हा चुकून सिग्नल तोडून पुढे गेली

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/pCaVDvsMjP4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जुलै 17, 2015

मत्सर

अमेरिकेतील एका संशोधनानुसार सामाजिक माध्यमांवर (social media) अतिरिक्त वेळ घालवणाऱ्या व्यक्तींना एक प्रकारच्या न्यूनगंडाची बाधा होते. सामाजिक माध्यमांवरील ओळखीच्या इतर सर्व व्यक्ती पराकोटीच्या सुखात नांदत आहेत असं चित्र त्या व्यक्तीच्या डोळ्यांसमोर उभं राहतं. ती व्यक्ती स्वतःसुद्धा इतरांना तसंच भासवायचा प्रयत्न करत असली तरी कुठेतरी मनात स्वतःबद्दल कमीपणा बळावू लागतो. तुमच्या बाबतीत असं घडतं का?

त्या कुणाला आप्त-मित्रांच्या मृत्यूचा शोक नसतो
कारण कुणी मुळात आजारीच पडत नाही
सर्दी नाही खोकला नाही ताप नाही जुलाब नाही
कावीळ नाही नागीण नाही कॅन्सर नाही एड्स नाही

प्रत्येक जण सुसंस्कृत कुणी अपशब्द वापरत नाहीत
बायकोला मारणं सोडा साधं तिच्याशी भांडतही नाहीत
आईवडिलांची सेवा करतात मुलांचे पापे घेतात
सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतात

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/4YG0m3GMx24 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जुलै 3, 2015

दरवडेखोर

खरं बोलणं कधीही चांगलं, पण एखाद्या निरुपद्रवी असत्याने जर कुणाच्या मनाला बरं वाटत असेल तर अशा खोटं बोलण्याला कुणाची हरकत नसावी. स्वामीजींनीही आश्रमात शिरलेल्या दरवडेखोराच्या बाबतीत असाच काहीसा विचार केला ... 

ग्रीष्मातील मध्यान्ह असो वा असो दिवाळी दसरा
     नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा

ऐकून टापा घोड्यांच्या घाबरले लहान थोर
     आश्रमात शिरला जेव्हा तो एक दरवडेखोर
बंदूक त्याच्या पाठीवरती कमरेला अन् सुरा 
     कुणी धावला आडोशाला कुणी लपविते पोर

स्वामींपाशी एक जातसे मागून दुसरा तिसरा
     नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा
जून 19, 2015

वीकएंड

फार फार पूर्वीचे मध्यमवर्गीय म्हणे सिनेमे बघणं, आप्त-मित्रांच्या भेटीला जाणं, खरेदी करणं, मुलांचा अभ्यास घेणं, रेडिओ ऐकणं वगैरे गोष्टी आठवड्यातील कोणत्याही दिवशी करायचे. मग हे ३० / ४० / ५० वर्षांपूर्वीचे मध्यमवर्गीय आदिमानव वीकएंडला करायचे तरी काय?

नवीन काही घडत नाही तसाच दिवस सरे
     अनुभव एवढा मोठा माझा शत्रू तोच ठरे
रोज रोज कंटाळवाणं काम तेच तेच
     लोक तेच तेच आणि तेच तेच पेच

आठ वाजले तरी काम सोडत नाही पाठ
     दिवस ढकलतोय बघत वीकएंडची वाट