लहानपणी गिरवत होतो व्रात्यपणाचा कित्ता
आता मुलांसमोर होतो मोठा तत्ववेत्ता
मित्रांमध्ये विनोद करतो बायको करते छळ
तिच्यासमोर मात्र होतो दमयंतीचा नळ
आर्इवडिलांना भेटून लोटतो वर्षभराचा काळ
समोर त्यांच्या जाता होतो माझा श्रावणबाळ
माझ्याच घरात आहेत कितीतरी मुक्कामाला मी
बाकी सगळे खोटे खरा बाथरूममधला मी || १ ||
लिफ्टमध्ये जेव्हा शिरते शेजारीण ती छान
पोट आत छाती बाहेर माझा सुपरमॅन
घरी दारी एरवी असतो चेहरा गोरा मोरा
पण लिफ्टमन अन् चौकीदारासमोर मोठा तोरा
गाडी अशी चालवतो की मर्कट मद्य प्याला
एसीमध्ये बसून शिव्या देतो ज्याला त्याला
रूपं माझी असंख्य ती दाखवी समाजाला मी
बाकी सगळे खोटे खरा बाथरूममधला मी || २ ||
वरिष्ठांच्या ऐकून घेतो मुकाट मी डरकाळ्या
कनिष्ठांवर डुरकावतो मग जशा असाव्यात शेळ्या
सप्लायर्सशी अरेरावी ते आहेत जणू काही चाकर
कस्टमर्सशी बोलताना पण तोंडात घोळते साखर
शिपायाला उशीर झाला मारतो त्याला फाइन
सेक्रेटरीवर साहेबाच्या अन् मारून बघतो शाइन
जशी भेटतील माणसं तसाच रंग बदलला मी
बाकी सगळे खोटे खरा बाथरूममधला मी || ३ ||