पटवून देण्या खरंच तुमचा जन्म आहे झाला
जन्माच्या त्या दाखल्यावरती आधी तारीख घाला
वाढदिवसाची तारीख घालते आनंदाशी सांगड
तारखा असतात आयुष्यातील मैलाचे दगड || १ ||
कधी जन्मला शिवबा तर कधी सिकंदराची स्वारी
स्वातंत्य्राच्या लढ्यामध्ये तारखा असतात भारी
जन्म मॄत्यू भल्याभल्यांचे लक्षात ठेवणे अवघड
तारखा असतात आयुष्यातील मैलाचे दगड || २ ||
कोणत्या तारखेस येणार आहेत ह्मा वर्षीचे सण
शाळेकरता सुट्टी म्हणजे हर्षाचे आंदण
परीक्षांची तारीख लागली अभ्यास मग रग्गड
तारखा असतात आयुष्यातील मैलाचे दगड || ३ ||
बघता बघता लग्न ठरतं तारीख होते नक्की
तारखेला त्या आयुष्यातील नाती होतात पक्की
तारखेची त्या साक्ष चढण्या संसाराचा गड
तारखा असतात आयुष्यातील मैलाचे दगड || ४ ||