अंधुक झाली सारी
दुनिया होती न्यारी
काचेवरती आता
धूळ साचली भारी
जुनं वाचनालय
आहे किती समय
बंद करतील आता
वाटे मजला भय
मोठ्या एका मंत्र्याचं म्हणे बने इथे स्मारक
मी तर आहे कपाटामधील जीर्ण शीर्ण पुस्तक || १ ||
कथा व कादंबरी
गंमत त्यांची खरी
कल्पनेतले धागे
वस्त्र बने भरजरी
जे न पाहे रवी
पाहायचे ते कवी
तिला भुलविण्याकरता
कविता वाटे हवी
आमच्यामध्ये वसले मोठे कवी आणि लेखक
मी तर आहे कपाटामधील जीर्ण शीर्ण पुस्तक || २ ||
होती आमुची शान
मोठे आणि लहान
वाचून काढत होते
आमचं पानन् पान
ज्ञानाचे ते धन
आणि मनोरंजन
आम्हीच तेव्हा होतो
बुद्धीचे चलन
सरस्वतीचे रूप म्हणुनी होती नतमस्तक
मी तर आहे कपाटामधील जीर्ण शीर्ण पुस्तक || ३ ||
2 Comments
उत्कृष्ट काव्या नुभव
धन्यवाद विवेकजी …