देव चालला होता फारच सुरेख होते जंगल
जंगलामध्ये तळे होते परंतु फार अमंगल
तळ्यामध्ये त्या बेडूक होते त्यांना देव पुसे
इतक्या घाणीत सर्व जन तुम्ही राहता तरी कसे
सांगणार कोणा काय कुणाचे ऐकत कोणी नाही
तळ्यामध्ये ह्या माजे आमुच्या अशी बेबंदशाही || १ ||
सारे बेडूक गोळा झाले देवाजीच्या भवती
राजा द्या हो आम्हा सांगूनी त्याच्यासमोर लवती
देव सांगतो चर्चा करूनी सोडवा तुम्ही कलह
विकल्प नाही राजावाचून धरती ते आग्रह
कंटाळूनी ओंडका देऊनी देव तेथून जाई
तळ्यामध्ये त्या सुरू जाहली तेध ओंडकेशाही || २ ||
धबालकन ओंडका पडे तो तळ्यात उठती लाटा
घाबरले ते बेडूक सारे धडगत नाही आता
भीड चेपता एक तयावर बेडूक जाऊन बसला
हालत नाही डोलत नाही राजा असला कसला
पुन्हा सांगती बेडूक देवा उपाय करावा काही
देवाने मग साप धाडला आली सर्पशाही || ३ ||
नवीन ह्या राजाची काही न्यारीच होती बात
समोर जो जो दिसेल त्याला सुटला तो तर खात
बेडकांना त्या कळून चुकली आपली मोठी चूक
राजा म्हणून एक नेमला त्यांनी मग बेडूक
आपुला राजा आपुले हितच आपुल्याकरता पाही
असे म्हणोनी तळ्यात चालू झाली बेडूकशाही || ४ ||
4 Comments
खूपच छान
धन्यवाद..
खूपच सुंदर.
धन्यवाद प्रशांतजी..