जुलै 1, 2011

थोडा धीर धर

आपल्या देशाचा बट्ट्याबोळ करायला ब्रिटिशांना दोन शतकं लागली. मग त्या मानाने स्वातंत्र्य मिळून झालेली चौसष्ठ वर्षं कमीच नाहीत का? म्हणूनच आपला देश प्रगत देशांच्या पंगतीत बसवण्याकरता अधीर झालेल्या काही मंडळींना सांगावसं वाटतं की बाबा रे, धीर धर, 'थोडा धीर धर'!

जन्मदिन असे ब्रह्मांडाचा एक जानेवारी
आणि पुढील घडामोड समजा वर्षात झाली सारी
पहिले आठ महिने सूर्यच अस्तित्वात नव्हता
ऑगस्ट वीस दिवशी आली सूर्याची मग स्वारी

एकतीस डिसेंबर रात्री वाजून गेले दहा
पृथ्वीवरती मनुष्याचा पत्ता नाही पाहा
पावणेअकरा वाजता आले मनुष्यांचे पूर्वज
अकरा बावन्न वाजले शेवटी आपण आलो अहा
फेब्रुवारी 4, 2011

शून्य

मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये भारताचं योगदान 'शून्य' आहे! कारण मानवी इतिहासातील सर्वात जास्त क्रांतिकारी मानल्या जाणाऱ्या शोधांपैकी एक अशा शून्याचा शोध भारतात लावला गेला. संपूर्ण विज्ञान ह्या एका शून्यावर आधारित आहे. आणि क्लिष्ट होत जाणारं विज्ञान जसजसं तत्वज्ञानाच्या जवळ जात आहे तसतसं तत्वज्ञानातीलही शून्याचं महत्व अधिकाधिक जाणवू लागलं आहे.

आपल्याला एखादी भौतिक वस्तू जेव्हा दिसते
     संदर्भाला आजुबाजूस दुसरे काही असते
परमेश्वर जर ब्रह्मांडाच्या चराचरातून वसतो
     दिसेल कसा तो कोणालाही संदर्भच जर नसतो

शून्यत्वाचं रूप र्इश्वरी झालं म्हणूनच मान्य
     अनंत मोठ्या ब्रह्मांडाचं उत्तर आहे शून्य

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/mC5SjpZlGq0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 4, 2011

नगण्य

मी, मला, माझं, माझ्यामुळे, माझ्यासाठी, माझ्यावर, माझ्याकरता ... मनुष्याच्या अहंभावाला काही सीमा नाही. जिथे न फिरणारा भोवरा आधाराशिवाय जमिनीवर उभा राहील एवढ्या सूक्ष्म शक्यतेवर सारी जीवसृष्टी टिकून आहे, तिथे त्या जीवसृष्टीचा एक हिस्सा असलेल्या मानवजातीचा काय पाड! ब्रह्मांडाच्या विस्तारापुढे आपण किती कःपदार्थ आहोत ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर ह्या अहंभावामुळे निर्माण झालेले कित्येक प्रश्न सुटू शकतील ह्याबाबत कुणाला शंका राहणार नाही एवढं नक्की!

वर्षं झाली तेरा अब्ज आणि सत्तर कोटी
     इतक्या पूर्वीपासून सॄष्टी अस्तित्वात होती
केवळ दोन लक्ष वर्षांपूर्वी अवतरलास
     आहे तुझी कारकीर्द ह्मा भूतलावर छोटी

फार पूर्वी सुटला आहे समयाचा तो बाण
     भानावर ये माणसा आहेस नगण्य किती ते जाण
फेब्रुवारी 4, 2011

अंकायन

अंक किंवा आकडे म्हटलं की आपल्याला गणित आठवतं आणि गणित म्हटलं की बऱ्याच जणांना उगीचच धास्तावाल्यासारखं वाटायला लागतं. पण अंक म्हणजे केवळ गणिताचा विषय नव्हे. आयुष्यात आपल्याला सभोवती जागोजागी अंक दिसून येतील. अशाच आपल्या आयुष्यात येणाऱ्या दहा मूळ अंकाचं हे 'अंकायन'!

सान थोर नर नारी आणि राव असो वा रंक
     पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक