कविता

स्थलवाचक

माणूस हा मुळात भटक्या प्रवृत्तीचा प्राणी आहे. तसं नसतं तर आफ्रिकेच्या एका कोपऱ्यात जन्मलेल्या ह्या नगण्य सस्तन प्रजातीने सारं जग पादाक्रांत केलं नसतं. आधी आपले पाय, मग इतर प्राणी आणि मग यंत्रांचा वापर करून पर्यटन करणाऱ्या त्या आद्यप्रवर्तकाचा मी एक वंशज. निरनिराळ्या जागा पाहण्याची मला प्राकृतिक आवड आहे.

डिसेंबर 7, 2012

वैमानिका…

पूर्वीच्या काळी दूरदेशी गेलेला घरातील कमावता पुरुष घरी परतताना बैलगाडीच्या गाडीवानाला वेगाने गाडी हाकण्याची आर्जवं करत असे. आता काळ बदलला. बैलगाडीची जागा विमानांनी घेतली. पण त्या दूरदेशी गेलेल्या व्यक्तीच्या भावना बदलल्या आहेत का?

गेलो तुझ्याच संगे
रंगलो तिथल्या रंगे
परत यायचे माझे
स्वप्न कितीदा भंगे

येईन वर्षभरात
म्हणून हलविला हात
तीन वर्षं पण सरली
परते मी देशात

कितीक आल्या चिठ्ठ्या तरीही केली डोळेझाक रे
वैमानिका तू ऐक सांगतो विमान वेगे हाक रे

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/mtuPbhL2XZ4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 2, 2011

शहर

ही कविता २०११ साली सकाळ प्रकाशनाच्या 'शब्ददीप' ह्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे.

ग्रामीण भागातील समस्यांचा रामबाण उपाय म्हणून शहरांकडे बघितलं जातं. आणि मग गावातून शहरात येणारे लोंढे वाढतच जातात. आपल्या आई-वडिलांनी बहुतेक तेच केलं. पण सुव्यवस्था कोलमडलेल्या ह्या नगरांमध्ये गावातून येणारा माणूस खरच सुखी होतो का?

दहा बाय बाराची लहानशी खोली
     म्हातारीचा बिछाना बाळाची झोळी
मुलांचा अभ्यास बायकोचा स्वयंपाक
     तिथेच झोपतो करून अंगाची मोळी

झोपलो तरी असतो निदान पसरून पाय
     गाव सोडून मी मिळवलं काय?
ऑगस्ट 5, 2011

फाळणी

लवकरच आपण स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा करू. आपली पिढी स्वातंत्र्य गृहीत धरते आणि त्यात काही वावगं नाही, पण त्याचवेळी हे स्वातंत्र्य मिळवताना आपल्याला काय किंमत मोजावी लागली हे विसरून चालणार नाही. फाळणीच्या होमात होरपळलेल्या शहिदांना ही श्रद्धांजली!

दीड कोटी जन होऊनी गेले घरामध्ये बेघर
     पाच लक्ष चढले मृत्युच्या अघोर वेदीवर
सौहार्दाच्या अमृतावरी हलाहल कसे पडले
     कोण शत्रू अन कोण मित्र अन कसला हा संगर

वस्त्र विविधरंगी विणलेले उरले नाही तलम
     अशी फाळणीची अंगावर भरतच नाही जखम
एप्रिल 15, 2011

निसर्ग

२२ एप्रिल हा दिवस 'जागतिक पृथ्वीदिन' (International Earth Day) म्हणून साजरा होतो. सध्याच्या विज्ञानाच्या मर्यादांमुळे निदान नजीकच्या भविष्याततरी आपल्यासमोर पृथ्वी ग्रह सोडून दुसरा कोणताही विकल्प उपलब्ध नाही. आपल्यासारख्या शहरातल्या किड्यांना आपल्या सभोवतालचं काँक्रिटचं जंगल म्हणजेच पृथ्वी वाटली तर त्यात नवल नाही. पृथ्वीवरील निसर्गाचं सौंदर्य आणि ऐश्वर्य केवळ काव्यामध्येच राहणार नाही ना? असंच एक निसर्गावरील काव्य, पहा आवडतंय का ते ...

मेघ नभी थरथरले
सर सर पाणी झरले
नदी नालेही भरले   
     सचैल भिजली धरा
कोंब नवे अंकुरले
हिरव्या रंगी मुरले 
नवीन जीवन स्फुरले
     चमत्कार तो खरा

छाया वटवृक्षाची
अन् पाती गवताची
फळे भिन्न स्वादाची
     काय अहो आश्चर्य
विहरत गगनी पक्षी
हरीणकांतीची नक्षी
श्वास अडकला वक्षी
     पाहून ते सौंदर्य