कविता

व्यक्तिवाचक

आपल्याला आयुष्यात अनेक माणसं भेटतात ज्यापैकी ‘व्यक्ती’ म्हणता येतील अशी फार थोडी – जी आपल्या मनावर एक अमिट ठसा उमटवून जातात. आपलं आयुष्य समृद्ध करणाऱ्या ह्या व्यक्तींचे आपल्यावर अनंत उपकार असतात. अशाच काही व्यक्तींवर आधारित ह्या कविता.

जून 17, 2012

लाडकी

जून १७ (जून महिन्यातील तिसरा रविवार) हा दिवस आंतरराष्ट्रीय पितृदिन म्हणून साजरा होणार आहे. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पित्याने आपल्या अपत्याविषयी भावना व्यक्त करणं म्हणजे आपला कमकुवतपणा दाखवून देणं असा काहीसा समज रूढ होता. पुरुषप्रधान संस्कृतीप्रमाणेच हा समजही आता मागे पडत चालला आहे. एका पित्याच्या आपल्या अपत्याविषयी - विशेषतः कन्येविषयी - भावना किती हळव्या असू शकतात हे दाखवण्याचा हा प्रयत्न.

गळ्याला मिठी मारायचीस पलंगावर उभी राहून
पाठीवर चढून बसायचीस साखरेचं पोतं बनून
कधीही पडशील अशी भीती वाटायची तुला दुडूदुडू धावताना बघून
     अगदी आत्ता आत्तापर्यंत
डिसेंबर 15, 2011

सैनिक

(ही कविता २०१२ साली 'पुढचं पाऊल' ह्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे. )

बांगलादेशच्या युद्धाला चाळीस वर्षं झाली. भारताच्या दृष्टीने ती 'मदत' होती; पाकिस्तानकरता ती 'घुसखोरी' होती; तर बांगलादेशकरता तो 'स्वातंत्र्यलढा' होता. पण ह्या युद्धाचं चर्वितचर्वण करताना त्यात तिन्ही देशांच्या मिळून मृत्युमुखी पडलेल्या ४०,००० सैनिकांचा विचार कोणी करतंय का?

मनात माजे काहूर तुझिया आठवणींचे लाख
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक

तरुण पत्नी तुझ्या विचारी बसली झुरत असेल
अंध आईच्या घशामधुनी घासही सरत नसेल
उभे पिक ते कापणीविना झाले असेल खाक
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/y3_iUpzX8hA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 4, 2011

ती

एखादी व्यक्ती दुःखी आहे ह्या कल्पनेवर आपला फार पटकन विश्वास बसतो. मग ती व्यक्ती आपल्या जवळच्या नात्यातील असो नाहीतर केवळ कधीतरी ओझरती पाहिलेली असो. अर्थातच ह्या कल्पनेत नेहेमी तथ्य असतंच असं नव्हे ...

मी रस्त्यावरती
     अन् खिडकीमध्ये ती
दिसली ओझरती
     पण मनी अल्हाद झाला

मोकळे होते केश
     साधा घरचा वेष
ठाऊक नाही शेष
     पण चेहरा आपला वाटला