कविता

व्यक्तिवाचक

आपल्याला आयुष्यात अनेक माणसं भेटतात ज्यापैकी ‘व्यक्ती’ म्हणता येतील अशी फार थोडी – जी आपल्या मनावर एक अमिट ठसा उमटवून जातात. आपलं आयुष्य समृद्ध करणाऱ्या ह्या व्यक्तींचे आपल्यावर अनंत उपकार असतात. अशाच काही व्यक्तींवर आधारित ह्या कविता.

मार्च 7, 2014

गृहिणी

आपल्यापैकी किती पुरुष नोकरी सोडून घर सांभाळू शकतील? हसण्यावारी नेऊ नका, नुसत्या विचारानेही घाम फुटेल. अनेक कमावते पुरुष घरची आघाडी भक्कम ठेवणाऱ्या गृहिणीला सोयीस्करपणे कमी लेखतात. आठ मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' संपन्न होत आहे. त्यानिमित्त ह्या 'गृहिणी'चं केलेलं हे थोडंसं कौतुक . . .

बाहेरचे अन् घरचे सारे काम पाडिते पार
     सुट्टी नाही त्या कामाला ना सण ना रविवार
स्वागत करते आगंतुकाचे तरी प्रसन्न हसुनी
     राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी

पदोन्नतीची आशा नाही पदक नाही ना चषक
     गृहीतच धरती सारे तिजला राबे तरीही अथक
कौतुक सारे तिचे करूया निदान ह्या स्त्रीदिनी
     राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी
नोव्हेंबर 25, 2013

सचिन

सचिनबद्दल मी तुम्हाला काय सांगावे? सव्वीस वर्षांपूर्वी सुनील गावस्कर निवृत्त झाला (अति प्रेमापोटी सचिन आणि सुनीलचा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस करत आहे) तेव्हा एवढंच वाईट वाटल्याचं आठवतंय. गेली चोवीस वर्षं आपल्या धकाधकीच्या जगण्यात आनंदाचे असंख्य क्षण दिल्याबद्दल सचिनला धन्यवाद देण्याचा हा छोटासा प्रयत्न . . .

चोवीस वर्षे आपल्या मनात ज्या व्यक्तीने केलंय घर
नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर

विक्रम अळवावरचे पाणी मोडीत निघती नित्यनवे
अनंतकाळी अभेद्य टिकतील विचार हे असती फसवे
गर्वाचे घर वर ना येते आदर मिळतो राहुनी लीन
कीर्ती पचवुनी शांत राहावे उदाहरण ते दावी सचिन

धावांपेक्षा रचले ज्याने हर्षोल्हासाचे डोंगर
नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर
मे 3, 2013

बालपणीची मैत्रीण

फेसबुक आणि इंटरनेट सोडा, साधे फोनही दुर्मिळ असलेल्या आपल्या बालपणीच्या काळात मित्र किंवा मैत्रीण हरवून जाणं हे काही अपवादात्मक नव्हतं. तुमचे आहेत का हो असे मित्र किंवा मैत्रीण जे आजही आठवण आली की मनाला हुरहूर लावून जातात?

आठवत नाही आता
     आयुष्य सरकत जाता
कशा आणखी कोठे
     भिन्न जाहल्या वाटा

वाढे जगविस्तार
     असंख्य मनी विचार
नवलाईच्या डोही
     हरवून गेलीस पार
जानेवारी 18, 2013

स्वामी विवेकानंद

बारा जानेवारी रोजी नरेंद्र नाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद ह्या महापुरुषाची शतकोत्तर सुवर्णजयंती साजरी झाली. स्वामी विवेकानंदांसारख्या विराट व्यक्तिमत्वाला शब्दांमध्ये बंदिस्त करणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे. तरीही माझ्या वतीने हा आदरांजलीचा लहानसा प्रयत्न ...

वस्तुस्थिती घेण्यास जाणुनी फिरला साऱ्या देशी
प्रगल्भ करण्या विचार लांघे धर्मांच्याही वेशी
पाच वर्षं देशाटन केले चार धाम अन् काशी

पाहुनी द्रवला देशाच्या पिडीत मनीचा आक्रंद
तो भारतभूचा सुपुत्र होता स्वामी विवेकानंद
ऑक्टोबर 19, 2012

अर्थ

अपेक्षा नसताना अबाध्य राहते ती खरी मैत्री ... परिस्थिती कितीही निराशाजनक असली तरी कसोटीला उतरते ती खरी मैत्री ... आणि जगाच्या दृष्टीने निरर्थक कृत्याला केवळ आपल्या वैयक्तिक निकषांवर अर्थपूर्ण बनवते ती खरी मैत्री! अशा खऱ्या मैत्रीची परिमाणं मृत्यू नजीक असताना खऱ्या अर्थाने जगासमोर येतात ...

फार समय लोटला पडावी मध्यरात्रही झाली
     चिंतेने अन् त्याच्या आमुचा जीव होई वरखाली
चालत येणारी ती छबी मग आम्हां लागली दिसू
     खांद्यावरती ओझे ओठांवरती होते हसू
ऑगस्ट 3, 2012

मित्र एक चांगला

आंतरराष्ट्रीय मैत्रीदिन ५ ऑगस्ट रोजी (ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार) साजरा होत आहे. त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रक्ताच्या नात्यांच्या मर्यादा जिथे स्पष्ट होतात तिथून मैत्रीच्या नात्याची सुरुवात होते. मैत्रीकरता सामाजिक किंवा आर्थिक पत, वय, लिंग असे भेद आड येत नाहीत. आजच्या इंटरनेटच्या जमान्यात तर भौगोलिक अंतरही मैत्रीच्या आड येत नाही. अशाच माझ्या कैक योजनं दूर पसरलेल्या मित्रमंडळाला ही कविता समर्पित.

तुम्ही तिच्यावर मरता ठाऊक होते हे गावाला
प्रसंग आला बाका जेव्हा कळे तिच्या भावाला
तुमचा भाऊ बहीण तयांची मदत फक्त नावाला

     मिलन मनांचे व्हावे ज्याने चंग असा बांधला
     प्रेमभंग कथण्यास असावा मित्र एक चांगला