कविता

बालकाव्य

लहान मुलांचं आपलं एक सुंदर काल्पनिक जग असतं. मोठ्या माणसांनी घातलेल्या व्यावहारिकतेच्या पाण्याने त्यातील रंजकता विरळ होण्यापूर्वी त्या जगात अशक्य असं काही नसतं. त्यामुळे बालकाव्य लिहिताना आपल्या कल्पनाशक्तीच्या वारुचा लगाम सोडून त्याला चौखूर उधळू देता येतं. ह्या अशाच काही लहान मुलांच्या कविता.

ऑक्टोबर 7, 2011

प्रश्न

सणासुदीचे दिवस म्हणजे घरी देव-देवतांचा उल्लेख होणं ओघानेच आलं. अशा वेळी मोठ्या माणसांना न पडणारे प्रश्न लहान मुलांना साहजिकपणे पडतात. त्यात सुट्ट्या सुरु झाल्या की मग तर प्रश्नांना ऊत येतो. पहा ह्या प्रश्नांची उत्तरं देणं जमतंय का ...

आंघोळ सूर्यदेवाला आहे का हो माफ?
     पाणी घेतलं अंगावर तर नुसतीच होईल वाफ

शंकराला नाद लागला वाचन करण्याचा
     कसा मिळेल चष्मा त्याला तीन डोळ्यांचा?
मे 20, 2011

अजब जंगल

मे महिन्याची सुट्टी सुरु आहे आणि घरातल्या बाळगोपाळांना पाहून तुम्हालाही नक्कीच हेवा वाटत असेल. मुलांची मात्र धमाल सुरु आहे. खास तुमच्या घरातील बच्चे कंपनीकरता एक बालगीत सादर करत आहे, 'अजब जंगल'. त्यांना जरूर वाचून दाखवा ... पाहा आवडतंय का ते!

काळ्या फुलावरती एका बसला होता हत्ती
फुंकर मारता उडून गेला करू लागला मस्ती
मगरी उडत होत्या गगनी चालत नव्हती अक्कल
वाघ खाती गवत मोठं अजब होतं जंगल

भरधाव पळे कासव मागे लागली गोगलगाय
बिळात पळाला जिराफ माझा पडणार होता पाय
झाडावरच्या घरट्यात अंडी उबवत होतं अस्वल
चार पायांचा साप मोठं अजब होतं जंगल

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/1YgZacK0PAM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 4, 2011

चतुर कुत्रा

जंगलात हरवलेल्या कुत्र्याच्या अगदी जीवावर बेतलं होतं. पण आपला चतुरपणा वापरून कुत्र्याने - एकदा नाही तर दोनदा - आपली सुटका कशी करून घेतली त्याची ही गोष्ट.

दाट जंगलामध्ये हरवून
     गेला एक कुत्रा
डोक्याने तो चतुर जरी
     होता थोडा भित्रा

वाट चुकला होता सापडत
     नव्हता त्याला माग
दिसला त्याला येताना
     तिथून ढाण्या वाघ
फेब्रुवारी 4, 2011

आई नावाचं मशीन

मोठं झाल्यावर आपल्या लक्षात येतं की घरातील कामं आपण केल्याशिवाय होत नाहीत. मग वाटतं की लहानपणी ही कामं कशी अपोआप व्हायची. ह्याला कारण म्हणजे प्रत्येक घरात असतं एक आई नावाचं मशीन. हे मशीन कधी दमत नाही कधी थकत नाही आणि कधी कुरकुरतही नाही. पण मग हे मशीन चालतं तरी कशावर?

काल माझ्या घरी आल्या मैत्रिणी चिकार
     खूप पसारा केला आणि झाल्या मग पसार
आवर पसारा म्हंटलं म्हणजे येतो मजला शीण
     आमच्या घरी आहे आर्इ नावाचं मशीन