कविता

काव्यकथा

लहानपणी चांदोबा, किशोरमध्ये वाचलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, आई आणि आजीने सांगितलेल्या गोष्टी मनात अगदी घर करून राहतात. आणि आता मोठेपणी ह्या लहान गोष्टींची जागा घेतली आहे ईमेल आणि लघुसंदेशांनी. अशा ह्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या गोष्टींनी काव्यकथा बनलेल्या आहेत. ह्या कथा माझ्या नाहीत पण कविता नक्कीच माझ्या आहेत.

नोव्हेंबर 18, 2011

रफू

आपण बोलताना बरेचदा 'क्यायच्या क्याय!' विधानं करून बसतो आणि मग त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणीतून बाहेर कसं पडायचं ते आपल्याला समजत नाही. असे फाटलेले संवाद रफू करून देणारा एखादा शिंपी मिळाला तर त्याला कामाचा कधीही तुटवडा पडणार नाही. एका राजाला असा शिंपी मिळाला आणि त्याने त्या राजाची कशी मदत केली ते वाचा 'रफू' ह्या काव्यकथेत ...

राजाच्या दरबारी आला कलाकार तो करी सलाम
शिवणकलेचे घेईन दाम रफू करीन ते माझे काम

राजा म्हणतो त्याला
     असती मम दरबारी
शिंपी निपुण प्रभारी
     शिवणकला ती सारी

मला सांग मी तुजला
     कशास ठेवू जवळ
शिवणकला ती सकल
     त्यात काय ते नवल

शिंपी म्हणतो कपडे नाही रफू करीन मी बोल तमाम
शिवणकलेचे घेईन दाम रफू करीन ते माझे काम
ऑक्टोबर 21, 2011

अनाथ

आयुष्यात एखाद्या व्यक्तीच्या हातून घडलेल्या घोडचुकीचे परिणाम जर त्या व्यक्तीला भोगावे लागले तर आपण 'करावे तसे भरावे' असं म्हणून मोकळे होतो. पण त्याच चुकीचे परिणाम जर इतरांना भोगावे लागले तर त्याला काय म्हणावं ...?

घरी जाऊनी मला म्हणाला बाळा ही बघ आई
मला पाहुनी मान फिरवली शब्दही वदली नाही
चेहरा तिचा पाहुनी मनी ह्या प्रकाश पडला लक्ख
केवळ योगायोगे त्याने मला निवडले नाही

जन्माला घातले मला पण आठवण आली आज
मला बनविले अनाथ तेव्हा कसला होता माज
आज स्वतःला मुल नसे तर उरावरी पत्नीच्या
मला बसवितानाही त्याला वाटत नव्हती लाज

सोडून दिधले मला जगाच्या अमानवी रानात
दुनिया काही म्हणो मला पण आहे मी अनाथ
ऑगस्ट 19, 2011

बेडूकशाही

एकदा एका तळ्यातील बेडकांना साक्षात्कार झाला की आपल्यातील एखाद्या बेडकालाच जर राजा नेमलं तर तो आपल्या तळ्याचं भलं करेल. त्यानंतर ह्या तळ्यात आलेल्या बेडूकशाहीमुळे त्या बेडकांना काय काय भोगावं लागलं त्याची ही कथा. आपलं बरं आहे, आपण बेडूक नाही ... लोक आहोत ...!

राजाने त्या जाहीर केला नवा लगोलग कर
     मलाच देऊन जावा नसतील कष्ट करायचे तर
बघता बघता सारे भरती राजाचे त्या दाम
     विकल्प असता कोण करतसे आपुले आपण काम

तळे राहिले गलिच्छ राजा महालात पण राही
     अशा प्रकारे पसरू लागली तेथे बेडूकशाही
जून 3, 2011

अघोरी

जून ४ हा दिवस राष्ट्रसंघाने क्रौर्यामुळे बळी जाणाऱ्या बालकांचा दिवस म्हणून जाहीर केला आहे. ह्या क्रौर्याचा संबंध जरी युद्धकाळाशी असला तरी आपल्या समाजातही ह्या दिवसाचा संदर्भ महत्वाचा आहे. लहान मुलांवर हात उगारणं म्हणजे स्वतःचा बचाव करू न शकणाऱ्या व्यक्तीवर केलेला भ्याड अत्याचार. मुलांना सुधारण्याकरता त्यांना मारण्याआधी पालकांनी स्वतःला आरशात पाहावं. आपण ऑफिसला न जाण्याकरता खोटं कारण द्यायचं आणि मुलांनी खोटं बोललं की त्यांना मारायचं ह्यातील दांभिकता मुलांना लगेच समजते. माझी 'अघोरी' ही काव्यकथा लिहिताना मला बराच त्रास झाला. ती वाचताना कदाचित तुम्हालाही त्रास झाला तर ती सर्वस्वी माझी चूक असेल. पण कधी कधी एखादा मुद्दा जोरकसपणे मांडण्याकरता काहीतरी धक्कादायक लिहिणं भाग असतं ...

विचार करण्यापलीकडे मी
गेलो होतो पार
मिळेल त्याने हातावरती
केले चार प्रहार ...

आजही चिंटू माझ्यावरती
तितकंच प्रेम करतो
पण हाताकडे पाहत आपल्या
नेहमी प्रश्न पुसतो ...
मार्च 18, 2011

शिकवण

२१ मार्च हा दिवस 'आंतरराष्ट्रीय वर्णभेदविरोधी दिन' म्हणून पाळला जाणार आहे. भारताला वर्णभेदाची लागण जरी झाली नसली तरी जातीयवादाची पाळंमुळं फार खोलवर पसरलेली आहेत. २१ मार्च हा 'आंतरराष्ट्रीय कविता दिन'सुद्धा असल्यामुळे ह्या विषयावर आधारित माझी 'शिकवण' ही कविता सादर करत आहे.
 
स्वामीजींच्या मनात होता विचार काही नेक
     युवराजाला ठेवून घेण्या कारण होते एक
राजाच्या त्या राज्यामध्ये गेले होते स्वामी
     जनतेमध्ये दिसे तयांना दुःखाचा अतिरेक
 
जातीयतेला उधाण जागोजागी अस्पृष्यता
     मनामनातील भिंतींना ते राज्य देई मान्यता
भेदभाव तो पाहून झाले स्वामीजी विदीर्ण
     शिक्षण दिधले युवराजाला सर्वश्रेष्ठ मानवता
फेब्रुवारी 18, 2011

आई

८ मार्च हा 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' म्हणून पाळला जाणार आहे. आपल्या आयुष्यात येणारी पहिली महिला म्हणजे आपली आई. आईच्या आपल्या अपत्यावर असलेल्या निस्सीम, निर्भेळ, निर्व्याज प्रेमाला कशाचीही उपमा देता येणार नाही. पण आपण आपल्या आईच्या प्रेमाला तितकाच उत्कट प्रतिसाद देतो का? सादर आहे काव्यकथा 'आई'.
 
आटपाट गाव होतं घरं होती सोळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा
 
घर आणि शाळा सोडून जगच मजला नव्हतं
घरात आम्ही दोघंच आणि तिसरं कुणीही नव्हतं
किती होती कुरूप तिजला नव्हता हो अंदाज
एकमेव त्या डोळ्याची पण मलाच वाटे लाज
 
तिला बोलणं घालून पाडून हाच माझा चाळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा