कविता

काव्यकथा

लहानपणी चांदोबा, किशोरमध्ये वाचलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, आई आणि आजीने सांगितलेल्या गोष्टी मनात अगदी घर करून राहतात. आणि आता मोठेपणी ह्या लहान गोष्टींची जागा घेतली आहे ईमेल आणि लघुसंदेशांनी. अशा ह्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या गोष्टींनी काव्यकथा बनलेल्या आहेत. ह्या कथा माझ्या नाहीत पण कविता नक्कीच माझ्या आहेत.

जुलै 5, 2013

वेल

निसर्गाची हेळसांड केल्याचे काय परिणाम भोगावे लागतात ते उत्तराखंडातील घटनांवरून चांगलंच लक्षात आलं आहे. निसर्गावर कुरघोडी करताना आपणही निसर्गाचं एक अविभाज्य अंग आहोत हेच मुळी आपण विसरून बसलो आहोत.

वाढत गेली वेल परंतु अशी काही वाढली
     बुंध्यासंगे फांद्यांवरही दूर पसरू लागली
झाडावरच्या फुलपानांचा आटोपू लागे खेळ
     ओक्याबोक्या झाडावर मग उरली केवळ वेल
जून 21, 2013

गुन्हा

स्त्री आणि पुरुषांना एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण वाटावं हा निसर्गनियम आहे. ह्या आकर्षणाशिवाय स्त्री-पुरुषामध्ये प्रेमाची भावना घर करू शकते का? भावनात्मक शुद्ध अकामुक असं प्रेम खरंच असू शकतं का?

विस्फारून मी डोळे पाही चेहऱ्यावर विस्मय
     प्रथमच तिने पाहिले वरती आणून उसना आव
चेहऱ्यावरती थोडी अपेक्षा आणि थोडे भय
     सत्य कळे तिज पाहून माझ्या डोळ्यांमधले भाव
मे 17, 2013

टेलीविजन

तुम्हाला एखादं व्यसन आहे का हो? माझी खात्री आहे की तुमच्यासारखी मंडळी बहुतेक व्यसनांना ताब्यात ठेवत असतील. मीही ठेवतो. अपवाद आहे एका व्यसनाचा … टेलीविजनच्या व्यसनाचा! काही वेळा व्यसनमुक्त होण्याकरता काहीतरी धक्कादायक घडावं लागतं. कसं ते वाचा …

माझ्या मनात स्वार्थच आहे गोष्ट सांगते खरी
     टीवी बनूनी जायचे मला असे माझ्याच घरी
बोलत असताना मी घरचे सगळे असतील दक्ष
     दुसरे कुणी बोलले देणार नाहीत तरीही लक्ष
घरात प्रत्येकाला मी मग वाटेन हवी हवी
     देवा पुढल्या जन्मी मजला बनवशील का टीवी
मार्च 15, 2013

स्वप्नं

स्वप्नं दोन प्रकारची असतात. पहिल्या प्रकारची स्वप्नं असतात शक्यतेच्या चौकटीत बसणारी ... जी पूर्ण करण्याकरता कष्ट करावे लागतात. दुसऱ्या प्रकारची स्वप्नं मात्र भव्य, उदात्त असतात ज्यांना शक्यतेची चौकटच अमान्य असते. रणजी खेळणाऱ्या खेळाडूने कसोटी सामन्यांत खेळण्याचं स्वप्न बघणं हे झालं पहिल्या प्रकारचं. तर घरातच आरशासमोर उभं राहून आपणच शोएब अख्तरला मारलेल्या सिक्सरचं धावतं समालोचन टोनी ग्रेगच्या आवाजात करणं हे दुसऱ्या प्रकारचं. चंदू आणि बंडूची स्वप्नं कोणत्या प्रकारात मोडतात ते तुम्हीच ठरवा ...

चंदू आणि बंडूचीही
     आपली स्वप्नं होती
घर लहान माणसं फार
     परिस्थितीच होती

चंदू म्हणे घ्यायचा आहे
     flat एक चांगला
बंडू म्हणे चंद्रावरच
     बांधीन मी एक बंगला

चंदू सतत काळजीत बंडू आनंदात मग्न
तुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं
जुलै 6, 2012

सट्टा

सट्टाबाजारात नक्की काय होतं ते तुमच्यापैकी किती जणांना सांगता येईल? बहुतेक कोणालाच नाही. सट्टाबाजाराच्या चढ उतारांचं भाकीत करणारे हवामान खात्यातील 'तज्ज्ञां'इतकेच ज्ञानी असतात असा अनुभव आपल्याला येतो. सट्टाबाजारात नेहेमी सर्वसामान्यांचीच ससेहोलपट का होते हे सांगणारी एक मार्मिक ई-मेल मला एका मित्राने पाठवली होती. त्यावर आधारित ही कविता 'सट्टा'.

गावी व्यापारी एक आला
गोळा करतो प्रत्येकाला
लक्ष द्या सर्वांस म्हणाला
     काय सांगतो मी त्याकडे

फिरतो मी तर व्यापाराला
वस्तू विकेल ती विकण्याला
शहरी हवीत गिऱ्हाईकाला
     मोठ्या प्रमाणात माकडे
जानेवारी 4, 2012

बी पी

रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर किंवा बीपी हा धकाधकीच्या शहरी जीवनाने आपल्याला दिलेला शाप आहे. कोणत्याही वाईट सवयी शेवटी रक्तदाबाला आमंत्रण देणाऱ्या ठरतात. रक्तदाबाला कारणं अनेक पण विचार करा की ही सारी कारणं एकाच व्यक्तीच्या वाट्याला आली तर ...?!

डॉक्टर मला विचारत होते झालंय तरी काय
कसलं एवढं टेन्शन घेता बीपी झालंय हाय

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/DkiShkgFsSg ह्या ठिकाणी ऐकता येईल.