कविता

काव्यकथा

लहानपणी चांदोबा, किशोरमध्ये वाचलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, आई आणि आजीने सांगितलेल्या गोष्टी मनात अगदी घर करून राहतात. आणि आता मोठेपणी ह्या लहान गोष्टींची जागा घेतली आहे ईमेल आणि लघुसंदेशांनी. अशा ह्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या गोष्टींनी काव्यकथा बनलेल्या आहेत. ह्या कथा माझ्या नाहीत पण कविता नक्कीच माझ्या आहेत.

जुलै 4, 2014

पाप

पाप-पुण्याची अध्यात्मिक चर्चा ऐकायची असेल तर स्मशानासारखी जागा नाही. मरणाची अपरिहार्यता नजरेसमोर उभी ठाकली की राग, लोभ, द्वेष, मत्सर ह्या भावनांचा फोलपणा जाणवू लागतो. मात्र स्मशानभूमीच्या बाहेर हे विचार जिवंत ठेवू शकणारा खरा योगी असतो!

निरखून बघती स्वामी चिंता चेहऱ्यावरती आली
     माझे सोड अभाग्या लिहिले काय तुझिया कपाळी
तुझ्या जीवनी आता केवळ दिवस राहिले सात
     स्पष्ट दिसतसे मजला ती मृत्यूची सावली काळी

भाविक तो दचकुनिया उठला जसा दिसावा साप
     विसरुनी गेला प्रश्न स्वतःचा काय पुण्य अन् पाप
मे 2, 2014

दीर्घायुषी राजा

लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांतच पार पडतील. आता बहुतेक नवा भिडू, नवे राज्य आणि नवीन राजा. हा नवीन किंवा नव्याने येणारा जुना राजा ह्या गोष्टीतून काही बोध घेईल का?

. . .
 
दोन वर्षांपूर्वी शेवटी वदले त्यांना स्वामी
तुमच्या प्रश्नाकडे माझं खचितच आहे लक्ष
माझे विचार काही काळात येतील तुमच्या कामी
वठून जावा लागेल उद्यानातील तो वटवृक्ष

शब्द ऐकुनी त्या मंत्र्याचं डोकंच होतं फिरलं
समजत नव्हतं स्वामीजींच्या मनात काय दडलं
. . .
जानेवारी 3, 2014

प्रतिशोध

एखाद्या दुर्बल व्यक्तीवर अत्याचार करताना मनुष्य आपलं सामर्थ्य अबाधित राहील असं गृहीत धरतो. ही अहंगंडाची भावना इतकी प्रबळ असते की मग तो मनुष्य त्या व्यक्तीच्या मनात उद्भवणाऱ्या सुडाच्या भावनेलाही गौण समजतो. अशी चूक जीवघेणी ठरू शकते . . .

एके दिवशी घेऊन गेला मजला तो शहरात
गर्दीमध्ये नेऊन दिधला सोडून माझा हात
अशिक्षित निर्धन अन् दुःखी अबला मी असहाय
निर्दयतेने केला त्याने माझ्यावर अन्याय
तेव्हापासून अधोगतीला माझ्या ना अवरोध
जगत राहिले मन सांगे मम घे त्याचा प्रतिशोध
डिसेंबर 20, 2013

अंधश्रद्धा

अंधश्रद्धांच्या भंपक कल्पना आपल्या मनात इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की संकटाच्या वेळी आपली कशावर किंवा कुणावर अंधश्रद्धा नाही ह्या गोष्टीची भीती वाटू लागते. वाटतं की आपल्या हेकेखोरपणामुळे कुणाचं नुकसान तर होणार नाही ना . . .

चार दिवस घेतला तिने देवाचाच ध्यास
माझा मात्र विज्ञानावर अढळ असा विश्वास

तिच्या त्या वागण्याला होतो अंधश्रद्धा म्हणत
     माझं असं वागणं मात्र तिला नव्हतं पटत

तिच्या मते तर संकटसमयी कामी येते श्रद्धा
     मला म्हणाली विज्ञानावर तुझी अंधश्रद्धा

चार दिवस लागली होती दोघांची कसोटी
     माझा विश्वास कमकुवत की तिची श्रद्धा खोटी

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/o8vnBTlA_3Q ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 6, 2013

बूट

कोणत्याही स्पर्धेत उतरणारा प्रत्येक स्पर्धक पहिला क्रमांक मिळवण्याकरता तयारी करत असतो. मात्र पहिला क्रमांक येणार हे नक्की असताना जर कोणी दुसऱ्या क्रमांकावर येण्याकरता धडपडत असेल तर? कधीतरी माझ्या वाचनात आलेल्या कथेवर आधारित ही माझी काव्यकथा . . .

पाहता पाहता वाट उजाडला
     शर्यतीचा दिवस
माझ्या विजयासाठी ताई
     बोलली होती नवस

शर्यत सुरु झाली माझा
     सोडला नव्हता हेका
पुढे धावणाऱ्यास म्हणालो
     जिंक शर्यत लेका
ऑक्टोबर 18, 2013

दुःख

१७ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रसंघाने 'जागतिक गरिबी निर्मुलन' दिवस म्हणून जाहीर केलेला आहे. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने भारतात बऱ्याच जणांना अचानक गरीब दिसू लागले आहेत आणि गरिबीची जाणीव होऊ लागली आहे. गरिबी हेच जगातील दुःखाचं मुख्य कारण आहे. पराकोटीला पोहोचलं की शेवटी ह्या दुःखाचाच अभिमान मग मनात उरतो . . .

हेलावून मी गेलो पाहून दुःखाचे ते माप
     डोळ्यांमध्ये आणि दाटला माझ्या मग संताप
मागेपुढे नाही पाहिले धावून त्यावर गेलो
     अनावर मी झालो होतो मारले त्यास अमाप

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/XykWLdJfMEM ह्या ठिकाणी ऐकता येईल.