कविता

काव्यकथा

लहानपणी चांदोबा, किशोरमध्ये वाचलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, आई आणि आजीने सांगितलेल्या गोष्टी मनात अगदी घर करून राहतात. आणि आता मोठेपणी ह्या लहान गोष्टींची जागा घेतली आहे ईमेल आणि लघुसंदेशांनी. अशा ह्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या गोष्टींनी काव्यकथा बनलेल्या आहेत. ह्या कथा माझ्या नाहीत पण कविता नक्कीच माझ्या आहेत.

सप्टेंबर 16, 2016

दृष्टी

अज्ञानी समाजात एखाद्या व्यक्तीला ज्ञानप्राप्ती होते आणि मग ही व्यक्ती अज्ञानाचा अंधःकार दूर कसा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करू लागते. अशा व्यक्तीबाबत सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया दोन टोकांच्या असतात. एक तर समाज त्या व्यक्तीला वेडं ठरवतो किंवा देवत्व देतो. दोन्ही बाबतीत त्या व्यक्तीचे विचार समजून घेण्याची जबाबदारी मग समाजाची राहत नाही. मग हा समाज माणसांचा असो नाहीतर मुंग्यांचा ...

ओसाड होती जागा तेथे होते एक वारूळ
     शिरले होते त्या मुंग्यांच्या डोक्यात एक खूळ
वारुळाच्या बाहेर नजरेस लाल गोळा पडे
     हलत होता परत परत उजवी डावीकडे

एकाच रेषेत दिसू शकायची त्यांना सारी सृष्टी
     मुंग्यांच्या त्या समुहा होती एकमितीय दृष्टी
जुलै 22, 2016

पीळ

वाढती वयोमर्यादा आणि आण्विक कुटुंबसंस्था ह्यामुळे वार्धक्याचा सामना कसा करायचा हा प्रश्न भेडसावू लागला आहे. जात्यातल्यांना भरडताना पाहून आता सुपातलेही चिंतातुर होऊ लागले आहेत. स्वाभिमानाने आयुष्य जगल्यामुळे म्हातारपणी आपण कोणावर ओझं तर बनणार नाही ना हा विचार चाळिशीतच त्रास देऊ लागला आहे. मात्र काही बाबतीत अति स्वाभिमान दाखवणंही चुकीचं ठरू शकतं...

झाले पाऊणशे वयमान
     नेहेमी ताठ ठेविली मान
केला नाही सहन कोणता
     आयुष्यात कधी अपमान

माझा मित्र मला भेटला
     तो वृद्धाश्रम संस्थेतला
जाऊन राहीन त्या संस्थेत
     माझा निर्णय मी घेतला

मनात दाटे औदासिन्य
     मन तरी वागते अहंमन्य
इकडे आड विहीर अन् तिकडे
     नव्हता विकल्प कुठला अन्य
मार्च 18, 2016

नव्याण्णववासी

तीन खोल्यांच्या घरात राहणाऱ्या बऱ्याच जणांना चार खोल्यांच्या घराची आस असते. त्याच वेळी काही जण दोन खोल्यांच्या घरातही सुखाने नांदतात. असण्या / नसण्याच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला हा विसंवाद दिसून येतो. ह्याला कारण म्हणजे आपण बहुतेक सगळेच 'नव्याण्णववासी' आहोत . . . 

राजा होता एक 		स्वामींपाशी आला
होता मोठा नेक 		पण दुःखी होता झाला

माझ्यापाशी छान 	सुखसंपत्ती सारी
तरीही समाधान		नाही मनाच्या दारी

स्वामी थोडे हसले 	हळूच आपुल्या गाली
राजासमोर बसले 	नजर तयाच्या भाळी

चिंता तुझ्या मनाशी 	आहे त्याच्या मागे
तू नव्याण्णववासी 	कारण आहे साधे
फेब्रुवारी 5, 2016

नरक

सुख आणि दुःख ह्या दोन्ही सापेक्ष गोष्टी आहेत. इतरांच्या दृष्टीने दारिद्र्यात पिचलेला, संकटांनी घेरला गेलेला मनुष्यही सुखी असू शकतो आणि लौकिकार्थाने सर्व सुखांनी ज्याच्या पायाशी लोळण घेतली आहे असा मनुष्यही अत्यंत दुःखी असू शकतो. आपल्या प्राक्तनात लिहिलेल्या आयुष्याला स्वर्ग म्हणायचं की नरक हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून असतं...

 देवदुताने आश्चर्याने चित्रगुप्तास पुसले
शेठ किरोडीवरी येथले भाग्य असे का हसले
दीनदुःखीतांना लुटले हा मनुष्य ऐसा पापी
पैशांकरता केले ह्याने धंदे कसले कसले

पाप्यांना जर सुख मिळाले बसेल कैसा वचक
          हा तर आहे नरक
जानेवारी 1, 2016

वरचढ

खऱ्या सामर्थ्याची ओळख पटण्याकरता पुरावे द्यावे लागत नाहीत आणि जाहिरातही करावी लागत नाही. दोन व्यक्ती भांडत असताना कोणती व्यक्ती सामर्थ्यवान आहे आणि कोणती केवळ आव आणत आहे ते लगेच कळतं. इंद्रदेव आणि शनिदेव एकदा भांडले. त्या भांडणाचा निकालही असाच काहीसा लागला ...

प्रलय जाहला तिन्ही लोकी लोक भ्यायले मनी
     स्वर्गामध्ये भांडत होते इंद्रदेव अन् शनी

चूक कुणाची होती प्रश्न हा झाला कधीच बाद
     तू मोठा का मी मोठा हा खरा शेवटी वाद

अंती वदला शनी ठेविला नाहीस माझा मान
     शूर स्वतःला समजतोस तर हे माझे आव्हान
डिसेंबर 18, 2015

माकड आणि माणूस

माकड आणि माणसाचा पूर्वज एकच होता असं विज्ञान सांगतं. ह्याबाबतीत विज्ञानाची प्रमेयं आणि सिद्धांत काही असोत, पण बरेचदा माणूस आपल्या वागण्याने ह्या विधानाची सत्यता सिद्ध करताना दिसतो. माणसांवर उपचार करण्यापूर्वी बऱ्याच वैद्यकीय चाचण्या माकडांवर केल्या जातात. ह्यात वैद्यकीय मानसोपचाराचाही समावेश होतो. अशाच एका चाचणीचे निष्कर्ष काय आले ते पाहा...

पाहण्याकरता एकदा माणसं कशी वागतात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात

खोलीमध्ये शिडी एक
    उभी होती केली
हुशार एका माकडाची
    नजर त्यावर गेली
शिडीवरती टांगला होता
    केळ्यांचा एक घड
खुणवत होता खायला मला
    शिडीवर तू चढ

माकडाला त्या झालं कधी लावीन त्याला दात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात