कविता

काव्यकथा

लहानपणी चांदोबा, किशोरमध्ये वाचलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, आई आणि आजीने सांगितलेल्या गोष्टी मनात अगदी घर करून राहतात. आणि आता मोठेपणी ह्या लहान गोष्टींची जागा घेतली आहे ईमेल आणि लघुसंदेशांनी. अशा ह्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या गोष्टींनी काव्यकथा बनलेल्या आहेत. ह्या कथा माझ्या नाहीत पण कविता नक्कीच माझ्या आहेत.

मे 13, 2018

निरुपयोगी

जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! निर्व्याज प्रेमाची व्याख्या कुणी विचारली तर त्याला ‘आई’ असं एका शब्दात उत्तर देता येईल. आपल्या शरीराचा एक हिस्सा असलेलं आपलं अपत्य आईकरता आयुष्याचा केंद्रबिंदू असतं. मात्र सध्याच्या वाढत्या आयुर्मर्यादेच्या काळात अनेक आयांना आपण ‘निरुपयोगी’ झाल्याची खंत छळत असते. अशाच आजच्या एका आईची ही कहाणी...

एकच इच्छा धरली होती तीही आता फळली
     आयुष्याला परंतु काही दिशाचा नाही उरली

रमे पुत्र संसारी आली सुखे हाताशी सारी
     आर्इची आता पण त्याला अडचण वाटे भारी

घरात आहे परंतु काही उपयोगाची नाही
     ना कन्या ना पत्नी ती तर होती केवळ आर्इ ||
एप्रिल 7, 2018

उपदेश

आंतरराष्ट्रीय आरोग्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आरोग्य हा शब्द बोलून पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला सतराशे साठ सल्ले मिळतात... विशेषतः dietingच्या बाबतीत. एखादा सल्ला आचरणात आणणं किती कठीण आहे हे प्रत्येक सल्ला देणारा विचारात घेतोच असं नाही ....

स्वामीजींच्या भेटीसाठी शेटजी आला एक
     संगे घेऊन आला होता मुलगा त्याचा छोटा
पैसा होता खूप तरीही वृत्ती होती नेक
     दुःख होतं एकच मुलगा लाडावलेला होता

फार दुरून आला होता ऐकून ज्यांचे नाव
     त्या स्वामींना पाहून त्याने वाकून प्रणाम केला
स्वामीजींच्या चेहेऱ्यावरती तेजःपुंज भाव
     शेटजीच काय मुलगा देखील पाहून भारून गेला
फेब्रुवारी 3, 2017

पेराल तसे उगवेल

निवडणुका येत आहेत. 'पेराल तसे उगवेल' ही उक्ती निवडणुकीतील मतदानाइतकी दुसऱ्या कशालाही चपखल बसत नसेल. तेव्हा सावधान! ह्या म्हणीला साजेशी एक छोटीशी काव्यकथा सादर करत आहे ...

आला कच्च्या रस्त्याची खात सगळी धूळ
     कमाईचं होतं त्याच्या केवळ एकच मूळ
बनवत असे महिनाभर सतत करून कष्ट
     ताजा शुद्ध सोनेरी साखरेसारखा गूळ

जायचं होतं परत लांब होती त्याला घाई
     महिनाभर चालवायची होती आजची कमाई
धान्य भाज्या भांडी कपडे मुलांसाठी खेळ
     घरी वाट पाहती मुलं आणि त्यांची आई

गूळ दुकानात विकायला गाठली त्याने पेठ
     त्याला बघून बाहेर आला दुकानातला शेठ
चेहेऱ्यावर संताप त्याच्या मावता मावत नव्हता
     येऊन शेतकऱ्याची त्याने मानगूट धरली थेट
जानेवारी 20, 2017

श्रद्धा

एखाद्या गोष्टीचा सतत जप करणं म्हणजे श्रद्धा नव्हे. एखाद्या गोष्टीशी संबंधित कर्मकांड काटेकोरपणे करणं म्हणजे श्रद्धा नव्हे. श्रद्धा म्हणजे संपूर्ण विश्वास. आपल्या श्रद्धास्थानांना धक्का लागू नये म्हणून कोणत्याही थराला जाण्याच्या आजच्या काळात श्रद्धेची ही व्याख्या किती जणांना लागू होते?

इंद्रदेवजी बसले होते
     नारद म्हणती त्यांना
पृथ्वीलोकी पर्जन्याचा
     यज्ञ होई पाहा ना

इंद्रदेव हसले अन् वदले
     ठाऊक आहे मजला
यज्ञाचा तो घोष कधीचा
     आहे मला समजला

कामच आहे माझे देईन
     तेथ पर्जन्यदान
गर्दीत आहे एक तरी का
     बघतो श्रद्धावान
डिसेंबर 2, 2016

नियती

निवृत्तीनंतर मी गावी जाऊन राहणार आहे; माझ्या मुलीला मी डॉक्टर बनवणार आहे; येत्या तीन वर्षांत युरोप फिरून येण्याचा विचार करतोय; पुढल्या वर्षी तुझा वाढदिवस येईल तेव्हा जेवायला हॉटेलात जाऊ या; उद्या मी लवकर घरी येणार आहे ... आपल्यापैकी प्रत्येकजण अमरत्वाचा पट्टा घेऊन आल्याप्रमाणे वागत असतो. आयुष्याचा बुद्धिबळाचा डाव आपण 'नियती' ह्या अपराजित खेळाडूबरोबर खेळत आहोत हेच विसरत असतो ...

समोरची ती वयस्क बाई सांगत होती नवऱ्याला
     किती दिसांनी भेटेल आता आपला मुलगा आपल्याला
इतके दिवस तिकडे राहिला कसा असेल तो दिसत
     आवाज आला मला कुणीतरी होतं छद्मी हसत

वेटिंगरूमच्या फोनवरती लागला एकजण ओरडायला
     पोहोचतोच आहे थोड्या वेळात पाहून घेतो तुम्हाला
पैसे तयार ठेवा नाहीतर नाही तुम्ही वाचत
     आवाज आला मला कुणीतरी होतं छद्मी हसत
ऑक्टोबर 21, 2016

नशीबवान

प्रेमात पडताना 'पडणं' हे क्रियापद तोंडघशी पडणं ह्या अर्थाचंही ठरू शकतं ह्याचं भान ठेवावं लागतं. पण अनुभवावरून शिकता आलं तर ते प्रेम कसलं. तिथे 'पुढच्यास ठेच मागचा पडला' असं होण्याची शक्यता जास्त असते . . .

दिसली कोपऱ्यात दूर
आपल्याच कामात चूर
     पहिल्यांदा ती मला
कोणाच्या ना अध्यात
आणि नाही मध्यात
     म्हटलं बोलू चला

ऑफिसमधले सारे
राहती दूर बिचारे
     तिची वाटते भीती
मोठी वयाने जरी
मनोमनी तिजवरी
     जडली माझी प्रीती